Ad will apear here
Next
...आणि दिवाळी पहाट खुलू लागली

दिवाळीची पहाट सांगीतिक कार्यक्रमाने खुलवण्याची पद्धत आज सर्वदूर रूढ झाली आहे. ९०च्या दशकात ही संकल्पना पहिल्यांदा रुजली, ती राज्याची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यात. उत्साही आणि रसिक पुणेकरांनी या संकल्पनेला उदंड प्रतिसाद दिला आणि मग विविध संस्थांमार्फत ‘दिवाळी पहाट’चे आयोजन केले जाऊ लागले. राज्याच्या अनेक भागांतही ती पोहोचली. पहाटेच्या शांत प्रहरी संगीतमय वातावरणात फुलणाऱ्या या ‘दिवाळी पहाट’ची कहाणी उलगडणारा हा विशेष लेख...
..................................................... 

रात्र आणि दिवस यांना जोडणारी वेळ म्हणजे पहाट! ही वेळ अत्यंत शांत, आनंददायी आणि शीतल अशी असते. सणांचा राजा असलेल्या दिवाळीत या पहाट प्रहराला विशेष महत्त्व आहे. दिवाळीच्या पहिल्या दिवशी केले जाणारे पहिले अभ्यंगस्नान पहाटे केले जाते. दिवाळी हा अंधारातून उजेडाकडे नेणाऱ्या दिव्यांचा सण असला आणि त्यासाठी रात्रीचे महत्त्व असले, तरीही या सणात पहाटेचाही संदर्भ आहे. कृष्णाने नरकासुराचा वध केला, त्याचे प्रतीक म्हणून नरक चतुर्दशी साजरी केली जाते. हा वध पहाटे झाला होता. त्यामुळे ही पहाट पवित्र मानली जाते आणि अशी ही पवित्र पहाट दिवाळीच्या या पाच दिवसांच्या सणात अंतर्भूत झाली आहे. दिवाळी हा सर्व सणांतील मोठा सण असला तरी तो गणेशोत्सवासारखा सामाजिक नाही. हा एक घरगुती सण आहे. 

डॉ. सतीश  देसाईसाधारणतः ९० च्या दशकात दिवाळी सामाजिक स्तरावर साजरी करण्यासाठीच्या काही संकल्पनांवर विचार सुरू झाला. पुण्यातील डॉ. सतीश देसाई यांच्या मनात ‘दिवाळी पहाट’ ही संकल्पना आकाराला आली आणि आपल्या ‘त्रिदल’ संस्थेद्वारे त्यांनी १९९३च्या दिवाळीला ‘दिवाळी पहाट’ची संकल्पना प्रत्यक्षात आणली. अशा पद्धतीने सर्वप्रथम दिवाळी पहाट संकल्पनेची सुरुवात पुण्यात झाली. ही पहिली दिवाळी पहाट सजवणारे कलाकार होते ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर. परंतु नवीन संकल्पना पहिल्याच प्रयत्नात रुचेल ते पुणे कसले..? त्यामुळे देसाई यांच्या या पहिल्यावहिल्या दिवाळी पहाट कार्यक्रमाला पुणेकरांनी फारसा प्रतिसाद दिला नाही. हा कार्यक्रम म्हणावा तसा यशस्वी झाला नाही. यात डॉ. सतीश देसाई आणि त्यांच्या टीमला आर्थिक नुकसानही सहन करावे लागले; पण असे असले तरीही पुढच्या वर्षीही ही दिवाळी पहाट आणखी छान पद्धतीने सजवायची असे त्यांनी ठरवले. 

पुढील वर्षी मग देसाई यांनी ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रमाचे आयोजन पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावरील बालगंधर्व नाट्यगृहात केले. या कार्यक्रमापासून पुढे मग दिवाळी पहाट या संकल्पनेला लोकांचा प्रतिसाद मिळू लागला. दिवाळी पहाट ही अगदी मानाची, प्रेमाची, आदराची गोष्ट ठरली. आता तर दिवाळी पहाट कार्यक्रम केवळ पुण्यातच नाही तर महाराष्ट्रातील अनेक छोट्या-मोठ्या शहरांत होतात. इतकेच नाही, तर महाराष्ट्राबाहेर मध्य प्रदेशमध्ये इंदूर, गुजरातमध्ये बडोदा, हैदराबादमध्येही ‘दिवाळी पहाट’चे कार्यक्रम आयोजित केले जातात. आता या अस्सल मराठी कार्यक्रमाने महाराष्ट्राची वेस तर ओलांडलीच आहे, शिवाय देशाचीही सीमा पार करून तो सातासमुद्रापार गेलाय. अमेरिकेत शिकागो येथील महाराष्ट्र सांस्कृतिक मंडळातर्फे दिवाळी पहाट साजरी केली जाते. इंग्लंड, कॅनडा, दुबई या देशांतही ‘दिवाळी पहाट’चे कार्यक्रम आयोजित केले जातात.

मराठी रसिक आणि संगीताचा फार जवळचा संबंध आहे. शास्त्रीय संगीत, सुगम संगीत, गीत रामायण यांसारखे भक्तिसंगीत, मराठी चित्रपट गाणी, बासरी, तबला तसेच इतर पारंपरिक वाद्यसंगीत यांचा ‘दिवाळी पहाट’च्या कार्यक्रमात प्रामुख्याने समावेश असतो. मोठमोठ्या दिग्गज गायकांपासून ते नवोदित गायकांनी या कार्यक्रमात गायन केले आहे. कित्येक नवोदित गायक तर ‘दिवाळी पहाट’च्या कार्यक्रमात कला सादर करून पुढे नावारूपास आले आहेत.
आज रसिक श्रोतेही दिवाळी पहाट कार्यक्रमाला हजर असणे हे मानाचे समजतात. पहाटे लवकर उठून स्नान करून अस्सल पारंपरिक मराठी पेहराव परिधान करून रसिक मंडळी दिवाळी पहाट कार्यक्रमाला येतात. या सगळ्यामुळे एकूणच वातावरणात एक औरच चैतन्य येतं. कलाकार मंडळीही तितक्याच उत्साहाने कार्यक्रम सादर करतात. संपूर्णपणे मराठी ‘फील' देणारी, भारावलेली अशी ही पहाट होऊन जाते.

श्रोत्यांसाठी ही दिवाळी पहाट उत्साहाची असते, आनंदाची असते, तशीच या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या कलाकारांसाठीही उत्साहाची आणि त्याहीपेक्षा कसोटीची असते. रात्री योग्य विश्रांती न झाल्यास इतक्या पहाटे स्वरयंत्र शक्यतो पूर्णपणे उघडत नाही, जीभही जड होते. त्यामुळे स्वर जड होण्याची शक्यता असते. यासाठी मग गायकांना लवकर उठून प्रथम रियाज करावा लागतो. 

आज मोबाइलवरील इंटरनेट आणि सोशल मीडिया यांमुळे सर्वकाही तात्काळ उपलब्ध असतानाही लोक दिवाळी पहाट कार्यक्रमांना मोठ्या संख्येने हजेरी लावतात. यासाठी खरे तर रसिकांचेही विशेष अभिनंदन केले पाहिजे. यू-ट्यूबवर सर्व गाणी उपलब्ध असतानाही रसिक मंडळी या कार्यक्रमांना जातात. कारण सूर, संगीत प्रत्यक्ष समोर बसून ऐकण्याच्या आनंदाची सर कशालाच नाही. परंतु काळानुसार जसे दिवाळीचे स्वरूप बदलले आहे, तसेच या कार्यक्रमाचेही रूप बदलले आहे. आता दिवाळी पहाट हा एक ‘इव्हेंट’ झाला आहे. आर्थिक गणिते वाढलेली आहेत. कलाकार, निवेदक, व्यासपीठ, सजावटकार, यांचे मानधन, प्रायोजक अशा सगळ्या गोष्टींमुळे दिवाळी पहाट हा वार्षिक व्यावसायिक कार्यक्रम बनला आहे आणि ते साहजिकच आहे. आजकाल दिवाळी सणाला विकतचा फराळ, वस्तूंची खरेदी, रोषणाई या गोष्टींमुळे एक व्यावसायिक ग्लॅमर आले आहे. परंतु दिवाळी पहाट आणि दिवाळी अंक या अस्सल सांस्कृतिक,  दर्दी, रसिक गोष्टींमुळे हा सण आणखी कलात्मक होतो आणि फक्त घरापुरता केंद्रित न राहता समाजाभिमुख होतो.

- अभिजित पानसे
मोबाइल : ८०८७९ २७२२१ 
ई-मेल : abhijeetpanse.1@gmail.com
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/EZVCBH
 सुरेख ..
सहज सोप्या शब्दांची मांडणी विशेष ..1
 फारच छान लेख. डॉ सतीश देसाई यांचे आभार व अभिनंदन.1
 Sunder vishleshan sir1
Similar Posts
‘तेजोमय’ दिवाळी अंकाचे प्रकाशन पुणे : पुणे डॉक्टर्स असोसिएशन (पीडीए) यांच्या वतीने यंदाच्या तेजोमय दिवाळी अंकाचे २१ ऑक्टोबर २०१८ रोजी प्रकाशन झाले. यंदाचा अंक हृदयरोगाशी संबंधित माहिती देणारा हृदयभान विशेषांक आहे. पुण्यातील पद्मावती येथील अण्णा भाऊ साठे सभागृहात झालेल्या या सोहळ्याला प्रमुख पाहुणे व व्याख्याते म्हणून डॉ. जगदीश हिरेमठ आणि ज्येष्ठ साहित्यिक प्रा
आठ वर्षांच्या ओवीचं कीर्तन दिवाळी पहाट विशेष कीर्तन कीर्तनकार : ओवी अमोल काळे, पुणे (वय वर्षे आठ - २०१७मध्ये) हार्मोनियम : स्वामिनी कुलकर्णी गायन : मोहिनी कुलकर्णी, अमोल अशोक काळे व्हिडिओ : देवेंद्र परांजपे, कोहिनूर इलेक्ट्रॉनिक्स प्रस्तुती : BytesOfIndia.com
रत्नागिरीत ‘स्वराभिषेक’तर्फे दिवाळी पहाट रत्नागिरी : शहरातील स्वराभिषेक आणि जयेश मंगल पार्क यांच्या संयुक्त विद्यमाने सात नोव्हेंबर २०१८ रोजी दिवाळी पहाटे साडेपाच वाजता जयेश मंगल पार्क येथे सुरेल मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे.
शून्य मी संपूर्ण... १० एप्रिल हा गानसरस्वती किशोरी आमोणकर यांचा जन्मदिन. त्या निमित्ताने, किशोरीताईंच्या आठवणींना उजाळा देणारा ‘शून्य मी संपूर्ण’ हा सुधीर कुलकर्णी यांचा दीर्घ लेख प्रसिद्ध करत आहोत. हा लेख ‘चतुरंग अन्वय’च्या २०१७च्या दिवाळी अंकात प्रकाशित झाला होता.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language